सोलापुरात नेमकं काय घडलं? एकाच इमारतीतील 40 जण आजारी, एका महिलेचा मृत्यू; उडाली खळबळ

सोलापूर : सोलापुरातील आसरा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एसबी प्लाझा इमारतीत कथित दूषित पाण्यामुळे सुमारे 40 रहिवाशांची प्रकृती बिघडली असून, उलट्या-जुलाबाच्या त्रासामुळे त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान, उपचारादरम्यान 49 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत महिलेचे नाव आफरीन मुजफ्फर शेख असे आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत होता. उपचारासाठी यशोधरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. डिस्चार्ज कार्डमध्येही मृत्यूचे कारण उलट्या-जुलाबाशी संबंधित असल्याची नोंद आहे.

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, एसबी प्लाझामध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार अनेकवेळा महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


दुसरीकडे, या प्रकरणाशी महापालिकेचा थेट संबंध नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. इमारतीचे स्वतःचे तीन बोअरवेल असून, त्यातील पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने पाणी दूषित झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील ड्रेनेज लाइन तुटलेली असल्याची माहिती वारंवार प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, वेळेत दुरुस्ती न झाल्यानेच पाणी दूषित झाले आणि अनेक नागरिक आजारी पडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या घटनेनंतर दूषित पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.