लोणी काळभोर : ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात दुमदुमले एमआयटी विश्वशांती गुरुकुल; पालखी सोहळा उत्साहात संपन्न..


लोणी काळभोर: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल (व्हीजीएस) येथे आयोजित करण्यात आलेला पारंपरिक पालखी सोहळा भक्ती, संस्कृती आणि उत्साहाचा अविस्मरणीय संगम ठरला. टाळ-मृदंगाच्या निनादात, भगव्या पताका फडकवत आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात निघालेल्या दिंडीमुळे संपूर्ण शाळा परिसर विठ्ठलमय झाला.

कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे तसेच पालखीचे विधिवत पूजन करून झाली. श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि वारकरी यांच्या पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी तुळशीवृंदावन, भगवे ध्वज, टाळ-मृदंगाच्या साथीने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पालखीची शोभा अधिक खुलवली. “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या अखंड नामघोषासह अभंग-भजन सादर करत विद्यार्थ्यांनी परिसर भक्तिरसात न्हाऊन काढला.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा अँथनी यांनी विद्यार्थ्यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या भक्तीची महती, पंढरपूर वारीची समृद्ध परंपरा आणि संतांच्या विचारांचे सामाजिक महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या समता, मानवता आणि समाजप्रबोधनाच्या शिकवणीचे आचरण जीवनात करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या सोहळ्यात विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. वारकरी परंपरेची ओळख, संत साहित्याची गोडी आणि भारतीय संस्कृतीतील आध्यात्मिक मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम प्रभावी ठरला. भक्तिभाव, संस्कार आणि सांस्कृतिक वारसा जपत एमआयटी विश्वशांती गुरुकुलमध्ये साजऱ्या झालेल्या या पालखी सोहळ्याने उपस्थितांच्या मनात विठ्ठलभक्तीचा अविस्मरणीय ठसा उमटवला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!