चिनी ॲपचा वापर अन्…, पुण्यातील भयंकर रॅकेटने महाराष्ट्रात खळबळ, पोलीस तपासात शॉकिंग खुलासा


पुणे : पुण्यात बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रॅकेटमध्ये चिनी ॲपचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, महाराष्ट्रातील विविध भागांपर्यंत या गैरप्रकाराचे जाळे पसरल्याचे तपासातून उघड झाले आहे.

शिरूर परिसरात मार्च महिन्यात उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणानंतर पोलिसांनी एका संशयित दलालाला अटक केली होती. त्याच्या मोबाईलची तपासणी करताना गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे एक चिनी ॲप आढळून आले. तसेच काही विशेष उपकरणांच्या मदतीने बेकायदा गर्भपात शस्त्रक्रिया केल्या जात असल्याची माहितीही तपास यंत्रणांना मिळाली आहे.

या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार दौंड तालुक्यातील केडगाव येथील अण्णा गिरी असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी दोन डॉक्टरांविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, तपासाची व्याप्ती आणखी वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भरारी पथकाने विविध सोनोग्राफी केंद्रांची तपासणी मोहीम हाती घेतली. एका खासगी रुग्णालयाच्या नोंदींची पडताळणी करताना बार्शी, करमाळा आणि आळंदी परिसरातील काही महिलांनी तेथे गर्भपात केल्याचे निदर्शनास आले.

तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली असून, मुख्य आरोपी अण्णा गिरी हा कोंढवा येथील एका खासगी रुग्णालयात कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या हालचाली आणि कथित गैरप्रकारांबाबत पूर्वीपासून माहिती असतानाही त्याच्यावर वेळेत कारवाई का झाली नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी असताना या प्रकरणाकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा रंगली आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे काही कारवाया रखडल्या असल्या तरी या काळात बेकायदा गर्भपाताचे प्रकार सुरूच राहिल्याचा आरोप होत असून, संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!