ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू; बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींमध्ये १२ जूनला आरक्षण सोडत


बारामती: बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया आता वेग घेऊ लागली असून राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १२ जून रोजी तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींमध्ये सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडणार आहे. या सोडतीकडे इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले असून आरक्षण निश्चित झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी २५ मे २०२६ रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच २६ मे २०२६ रोजीच्या निर्देशांनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसह नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी ही सोडत काढण्यात येणार आहे.

आरक्षण सोडतीसाठी ग्रामपंचायतनिहाय अध्यक्षी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेले ग्रामपंचायत अधिकारी सहायक अध्यक्षी अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, नियमबद्ध आणि राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.

सकाळी १० वाजता खराडेवाडी, कन्हेरी, पाहुणेवाडी, झारगडवाडी, वाकी, वडगाव निंबाळकर, उंडवडी सुपे, तरडोली, सोनगाव, शिरसने, सांगवी, पिंपळी, निंबुत, नारोळी, मोढवे, मेखळी, माळवाडी लोणी, माळवाडी लाटे, कोऱ्हाळे बुद्रुक, कटफळ, जैनकवाडी, जोगवडी, होळ, देऊळगाव रसाळ, बऱ्हाणपूर, मोराळवाडी आणि कोळोली या ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तर दुपारी ३ वाजता मळद, वढाणे, सोनवडी सुपे, शिरवली, सावळ, निरावागाज, माळेगाव खुर्द, लाटे, खांडज, खंडोबाचीवाडी, थोपटेवाडी, कांबळेश्वर, कारखेल, जळगाव सुपे, सस्तेवाडी, सदोबाचीवाडी, घाडगेवाडी, गोजुबावी, ढेकळवाडी, ढाकाळे, खामगळवाडी, चोपडज, बाबूर्डी, आंबी खुर्द, अंजनगाव आणि मुर्टी या ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सदस्य पदांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि सर्वसाधारण प्रवर्गानुसार आरक्षण निश्चित केले जाते. त्यानुसार महिलांसाठी राखीव जागांचाही समावेश असतो. त्यामुळे या सोडतीनंतर कोणती जागा कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहणार हे स्पष्ट होणार आहे. परिणामी अनेक इच्छुकांच्या राजकीय गणितांमध्ये बदल होण्याची शक्यता असून गावागावांत निवडणुकीच्या हालचालींना वेग येणार आहे.

आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांकडून प्रचाराची रणनीती आखण्यास सुरुवात होणार असून अनेक गावांमध्ये संभाव्य उमेदवारांची चाचपणीही सुरू झाली आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने १२ जून रोजी होणारी ही आरक्षण सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. याबाबतची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!