महाराष्ट्र पोलिस दलासाठी मोठी खुशखबर! केंद्राकडून 733 कोटींच्या निधीला मंजुरी; आधुनिकीकरणाला मिळणार वेग

मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने 733.28 कोटी रुपयांच्या विशेष योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे सायबर सुरक्षा, सागरी सुरक्षा, ड्रग्जविरोधी कारवाया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर तसेच आधुनिक शस्त्रे आणि वाहनांची उपलब्धता वाढवण्यास मदत होणार आहे.

या योजनेत 60 टक्के निधी केंद्र सरकारकडून तर 40 टक्के निधी राज्य सरकारकडून दिला जाणार आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानन रेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विशेष आभार मानले. या निधीमुळे महाराष्ट्र पोलिस दल अधिक सक्षम, आधुनिक आणि तंत्रज्ञानसज्ज होणार असल्याचे त्यांनी म्हटले.

वाढत्या सायबर गुन्हेगारी, ऑनलाईन फसवणूक आणि संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येणार आहे. तसेच सायबर सेलचे बळकटीकरण, किनारपट्टी सुरक्षेसाठी आधुनिक यंत्रणा, पोलिसांसाठी अत्याधुनिक शस्त्रे आणि जलद प्रतिसाद देणारी वाहने उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

महिला, बालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठीही विशेष तांत्रिक उपाययोजना राबविण्यास या निधीची मदत होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस दल देशातील अधिक सक्षम आणि हायटेक पोलिस दलांपैकी एक बनण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकणार असल्याचे मानले जात आहे.