अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोनं गाठणार एक लाखाचा टप्पा, मागील २४ तासांतच झाली लक्षणीय वाढ, जाणून घ्या नवीन दर…

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
बुधवारी सकाळी सोनं १००० रुपयांनी वाढल्याची माहिती मिळाली आहे. एक लाखाचा टप्पा गाठण्यासाठी केवळ २५०० रुपये महाग होणं बाकी आहे. अक्षय्य तृतीयेआधीच सोनं एक लाखाचा टप्पा गाठेल अशी सध्याची परिस्थिती आहे.
मंगळवारी (ता. १५) रोजी देशांतर्गत बाजारात सोन्याचा दर आजवरच्या सर्वात उच्च पातळीवर पोहोचला. सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल ९६,५०० रुपयांच्या जवळ पोहोचला होता तर चांदीनेही विक्रमी उडी घेत प्रति किलो ९७,५०० रुपयांचा टप्पा पार केला होता.
दरम्यान, ऑल इंडिया सराफा असोसिएशननुसार, दिल्ली सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर GST सह १००० रुपयांनी वाढून ९७,४०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. सोमवारी याच दरात ५० रुपयांची घसरण झाली होती. दुसरीकडे, ९९.५ टक्के शुद्धतेचं सोनं GST सह १०५२ रुपयांनी वाढून ९६,7०० रुपयांवर पोहोचलं, जे त्याचं ऑल टाइम हाय आहे.
तसेच ९९९ शुद्ध सोन्याचा दर प्रति तोळा ९४५५२ रुपये प्रति तोळा आहे. तर ९९५ शुद्ध सोनं ९३ हजार ५०० रुपयांवर पोहोचलं आहे. २२ कॅरेट सोनं ८६ हजार २०० रुपयांवर पोहोचलं आहे. तर १८ कॅरेट सोनं ७०५५६ रुपये प्रति तोळावर पोहोचलं आहे. यामध्ये GST, मेकिंग चार्जेस असं धरुन ही किंमत आणखी वाढणार आहे.
दरम्यान, सोन्यासोबतच चांदीचाही दरही विक्रमी वाढला आहे. सोमवारी ५०० रुपयांनी घसरलेली चांदी मंगळवारी २,५०० रुपयांनी उसळून ९७,५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. या दरवाढीमागे इंडस्ट्रियल डिमांड वाढल्याचं कारण सांगितलं जात आहे.