जेलमधून सुटल्यावर गुंडाची मिरवणूक, नंतर पोलिसांनीच काढली धिंड, पुण्यात नेमकं घडलं काय?

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून गुन्हेगारी विश्वातल्या अनेक बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील हडपसर परिसरातून भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती.
त्यानंतर अनैतिक संबंधाच्या संशयातून एका ठेकेदारावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले होते. या सगळ्या घटनांमुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नसल्याची चर्चाही झाली होती.
अशातच आता मोक्कातील आरोपीने येरवडा जेलमधून सुटल्यानंतर रॅली काढली होती. मोक्कातील आरोपी गणेश कसबेने समर्थकांसह पुण्यात रॅली काढली होती. या रॅलीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
त्यानंतर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होतं. मोक्का असलेल्या गुन्हेगाराची इतकी बिनाधास्तपणे रॅली काढण्याची हिम्मतच कशी होते? अशी टीका पुणे पोलिसांवर सुरु झाली होती. अखेर पुणे पोलिसांनी या टीकेला कृतीमधून उत्तर दिले आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस देखील ॲक्शन मोडवर आले. ज्या रस्त्याने गणेश कसबेने रॅली काढली. त्यांचे रस्त्यावरुन पोलिसांनी आरोपीची धिंड काढली. गुन्हेगारांवर दहशत बसावी व सर्वसामान्यांमध्ये भिती राहू नये यासाठी पुणे पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.
रॅली काढणाऱ्या आरोपींना येरवडा पोलिसांकडून अटक करून त्यांची धिंड काढण्यात आली आहे. रॅली काढणाऱ्या गुन्हेगारासह त्याच्या तब्बल 35 ते 40 साथीदारांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रफुल्ल ऊर्फ गुड्या कसबे (रा. लक्ष्मीनगर, येरवडा), दीपक मदने, करण सोनवणे, अनिकेत कसबे, अंश पुंडे, अजय कसबे, सागर कसबे, अभिजीत ढवळे, राहुल रसाळ, नन्या कांबळे, रोशन पाटील, तुषार पेठे व इतर ३५ ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी त्या भागातील आहेत म्हणून त्याच भागात त्यांची धिंड काढली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.