पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध ; आंदेकर टोळीने तुरुंगातुन लावली गणेश काळेची फिल्डींग; आंदेकरसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात टोळी युद्धाचा भडका उडाला आहे.माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येतील आरोपीच्या भावाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी तुरुंगात असतानाही आता बाहेर त्याने फिल्डिंग लावून खुनाची सुपारी दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.शनिवारी दुपारी कोंढवा-कात्रज परिसरात गणेश काळे या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. दोन दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी भररस्त्यात गणेश काळेला अडवून त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात गणेश काळेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गणेश काळेच्या हत्येमागे आंदेकर टोळीच असल्याचे पोलिसांनी निश्चित केले आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर आणि आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड कृष्णा आंदेकर यांनी तुरुंगातूनच गणेश काळेच्या हत्येचे नियोजन केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी बंडू आंदेकरसह एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, आमिर खान, मयूर वाघमारे, स्वराज वाडेकर, अमन शेख, अरबाज पटेल आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सर्व आरोपींना आज दुपारी कोंढवा पोलिसांनी न्यायालयात हजर केले आहे.

गणेश काळे हा समीर काळेचा भाऊ असून समीर काळे हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी आहे. त्यामुळे या हत्येमागे आंदेकर टोळीच असावी, असा संशय सुरुवातीपासूनच पोलिसांना होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकजण आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरचा नातू स्वराज वाडेकरचा मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून ही हत्या टोळीविरोधातील सूडातूनच घडवण्यात आली असल्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

