Pune : हॉर्न वाजविल्याने पाच जणाच्या टोळक्याकडून तरुणाला लाथाबुक्यांनी मारहाण; वडगाव शेरी परिसरातील घटना
पुणे : वडगाव शेरी परिसरात हॉर्न वाजविल्यावरून पाच जणांच्या टोळक्याने तरुणाला लाथाबुक्यांनी मारहाण करत त्याच्यावर दगडफेक केली व तरुणाच्या मैत्रीणीला देखील शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहानवाज शकिल अन्सारी (वय ३३, रा.इंद्रमणी सोसायटी, वडगाव शेरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, मझहर शेख (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) व त्याच्या पाच साथीदारांवर विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारी हे मैत्रीणीसोबत चारचाकी वाहनातून निघाले होते. विमानगर येथील दत्तमंदीर चौकाजवळ अन्सारी यांनी समोर असलेल्या दुचाकीस्वाराला हार्न दिला. त्यावेळी दुचाकीस्वार मझहर याला राग आला. त्या कारणातून त्याने आपल्या चार साथीदारांना बोलावून घेतले. अन्सारी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली.
तसेच, अन्सारी यांच्या मैत्रीणीला देखील शिवीगाळ करून हाताने धक्काबुक्की केली. टोळक्याने अन्सारी यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. तसेच कारवर दगड मारत नुकसान केले.
दरम्यान, पुढील तपास पोलीस निरीक्षक करत आहेत.