नवी कोरी थार घेऊन मित्र गेले कोकणात फिरायला, ताम्हिणी घाटात घडलं आक्रीत, 6 जणांचा मृत्यू, घाटात नेमकं घडलं काय?

पुणे : रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणारा ताम्हिणी घाट हा महत्वाचा दुवा समजला जातो मात्र या घाटात वारंवार अपघात होण्याची घटना समोर येत आहेत. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंडवे धावडे गावातील 6 तरुण आपल्या नवीन थार घेऊन कोकणात फिरण्यासाठी निघाले.

मात्र मंगळवारी पहाटे या तरुणांची ही थार कार घाटातील एका 500 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात सहा तरुणांचा मृत्यू झाला असून ते तरुण पुण्यातील रहिवासी आहेत.

साहील साधू गोटे (24), शिवा अरुण माने (19), ओंकार सुनील कोळी (18), महादेव कोळी (18), प्रथम रावजी चव्हाण (24), पुनीत सुधाकर शेट्टी (20) अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत.

साहिल हा गरिबीशी झुंज देऊन स्वतःची ‘थार’ घेणारा आणि पुण्यात 3-4 ठिकाणी ‘मोमोज’चा व्यवसाय उभा करणारा मेहनती तरुण म्हणून परिसरात ओळखला जायचा. आपल्या जिवलग मित्रांना घेऊन तो पहिल्यांदाच कोकण फिरायला निघाला होता.
अवघ्या 20 दिवसांपूर्वी साहिलने नवीन कोरी थार कार घेतली. साहिल आवडीने आपली कार घेऊन आपल्या मित्रांसमवेत कोकण दाखवण्यासाठी निघाला आणि वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात घडला. या अपघातामध्ये सहाही तरुणांचा मृत्यू झाला. सध्या 4 जणांचे मृतदेह रेस्क्यू करणाऱ्या टीमच्या हाती लागलेत उर्वरित दोघांचा शोध अजूनही सुरू आहे.
ताम्हिणी घाटातील अपघातात खोल दरीत कोसळलेला कारमधील मृत तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीम कडून रोप च्या सहाय्याचा वापर करावा लागत आहे. यासाठी रोप मुख्य रस्त्यावर बांधण्यात आल्यामुळे ताम्हिणी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिस प्रशासनाकडून पुणे आणि रायगड या दोन्ही जिल्ह्याच्या दिशेकडून वाहतूक थांबवून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवासी अडकून पडलेत.
