आषाढी वारीवर दु:खाची आणखी एक छाया! जेजुरी अपघातातील चौथ्या वारकरी महिलेचा मृत्यू; वाखरी पुलाच्या सुरक्षेवरही गंभीर प्रश्न

पुणे : आषाढी वारी २०२६ दरम्यान जेजुरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात झालेल्या भीषण अपघाताचे पडसाद अद्यापही कायम आहेत. या दुर्घटनेतील जखमी वारकरी महिला शैलजा दिनकर जगताप (वय ५८, रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली) यांचा उपचारादरम्यान पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांचा आकडा आता चार झाला असून वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

१३ जुलै रोजी पुरंदर तालुक्यातील बेलसर फाटा येथे राजवाडा लॉजसमोर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील साहित्य वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात अनेक वारकरी जखमी झाले होते. सुरुवातीला राजश्री शंकर भोसले (वय ५५, रा. कसबे डिग्रज), माधवी राजाराम सलगरे (वय ५५, रा. मालगाव) आणि नंदा बाबुराव पवार (वय ६०, रा. कवलापूर) या तिघी महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या तिन्ही महिला सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील रहिवासी होत्या.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या शैलजा जगताप यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे वारकरी समाजात हळहळ व्यक्त केली जात असून अपघातातील जखमींच्या प्रकृतीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, आषाढी यात्रेपूर्वी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. वाखरी ते पंढरपूर मार्गावरील नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाच्या भरावाला उद्घाटनापूर्वीच तडे गेल्याचे आणि कडील भराव खचल्याचे उघड झाले आहे. अवघ्या काही दिवसांत याच मार्गावरून लाखो वारकरी आणि सर्व मानाच्या पालख्या पंढरपुरात प्रवेश करणार असल्याने पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

घटना समोर आल्यानंतर संबंधित यंत्रणांनी पुलावरील भराव दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. मात्र यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी पुलाची संपूर्ण तांत्रिक तपासणी, गुणवत्ता चाचणी आणि कामाची चौकशी करण्याची मागणी वारकरी, स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांकडून होत आहे.
एका बाजूला जेजुरीतील अपघातात मृतांचा आकडा वाढत असताना, तर दुसऱ्या बाजूला वाखरी पुलाच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे यंदाच्या आषाढी वारीतील भाविकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.