पुण्यात चोरट्यांचा अनोखा कारनामा! पार्किंगमध्ये उभ्या टेम्पोतून तब्बल ८०० जिवंत कोंबड्या लंपास; १.६० लाखांचा फटका


पुणे : पुण्यातील चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आता चोरट्यांनी एक वेगळाच मार्ग अवलंबल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांऐवजी यावेळी अज्ञात चोरट्यांनी थेट जिवंत ब्रॉयलर कोंबड्यांवर हात साफ केला आहे. कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या टेम्पोमधून तब्बल ८०० जिवंत कोंबड्या चोरीला गेल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या चोरीमुळे सुमारे १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी धनंजय उरड (वय ५०) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय उरड हे कॅम्प परिसरातील एका चिकन वितरण केंद्रात व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. या केंद्रातून पुणे शहरातील विविध चिकन विक्रेत्यांना ब्रॉयलर कोंबड्यांचा पुरवठा केला जातो. नेहमीप्रमाणे फलटण येथून जिवंत कोंबड्यांची खेप घेऊन आलेला टेम्पो रविवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये पोहोचला होता. चालकाने वाहन पार्किंगमध्ये उभे करून विश्रांतीसाठी तेथून निघून गेला.

याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी टेम्पोतील तब्बल ८०० जिवंत कोंबड्या लंपास केल्या. चालक काही वेळाने परत आल्यानंतर वाहनातील कोंबड्या गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर संबंधितांना माहिती देण्यात आली आणि लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

फिर्यादीनुसार, चोरीला गेलेल्या प्रत्येक कोंबडीची किंमत सुमारे २०० रुपये असून एकूण ८०० कोंबड्यांची किंमत १ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिवंत कोंबड्यांची चोरी झाल्याने व्यापारी वर्गातही चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अलीकडच्या काळात पुण्यात घरफोडी, वाहनचोरी आणि दुकानफोडीच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भिंतीला भगदाड पाडून लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच आता भर बाजारातील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या टेम्पोतून शेकडो जिवंत कोंबड्या चोरीला गेल्याने शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी मार्केट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून संबंधितांची चौकशी सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!