‘भाजपला वेगळाच माज आला आहे’; सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल


मुंबई : सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक हे सध्या नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करत असून, त्यांच्या उपोषणाचा आज १९ वा दिवस आहे. पेपरफुटी, शैक्षणिक घोटाळे आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सोनम वांगचुक यांच्या मागण्या योग्य असून सरकारने त्या गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे. हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकते तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार ? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांनाच स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे.

निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत. त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जात आहे. तो कुठून आला असा प्रश्न बहुसंख्य माध्यमं विचारत नाहीयेत. उलट हीच बहुसंख्य माध्यमं त्यांच्या अदृश्य बॉसच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील स्वकीयांची आणि विरोधकांना कसं बदनाम करता येईल यांत व्यस्त आहेत. आणि जी माध्यमं बोलत आहेत त्यांना आणि त्यांच्या मालकांच्या डोक्यावर एक टांगती तलवार फिरत आहे.

त्यामुळे एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे, असं ते म्हणाले. त्यांच्या सोयीचा असेपर्यंत भाजपला तो माणूस प्रिय असतो सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. अर्थात भारतीय जनता पक्षाचं एक बरं असतं की त्यांच्या सोयीचा असेपर्यंत त्यांना तो माणूस प्रिय असतो. सोनम वांगचुक यांना २०१८ साली री-इन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जा इत्यादींबद्दल ऐकून घेऊन त्यांचं कौतुक पण केलं होतं. अर्थात तेंव्हा आम्ही किती अपारंपरिक उर्जेला महत्व देतो हे दाखवायचं होतं म्हणून सोनम वांगचुक चालले.

पुढे लडाख हा स्वतंत्र प्रदेश घोषित झाल्यावर वांगचुक यांना पण भाजपचं कौतुक वाटलं. पण पुढे वांगचुक यांच्या लक्षात आलं की यांचे हेतू अजिबात स्वच्छ नाहीत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा, लडाखमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ हवेत, तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे या मागण्या वांगचुक यांनी केल्या, त्यासाठी उपोषण, आंदोलनं केली पण सरकारने काहीही केलं नाही. त्यांना आश्वस्त केलं आणि पुढे कृती काहीच नाही. कारण हेतू जे दाखवले जातात तसे कधीच नसतात, असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहीलं आहे. आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत.

मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आत्ता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत. हे सगळं यांच्या काळात का होतं आणि ते झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता. भाजपला माज आला आहे निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आहे अशी टीका राज ठाकरे यांनी केली. पंतप्रधानांना केली विनंती माझी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला.

NEET परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाही. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे. आणि हे आत्ताच घडलं आहे असं नाही याच्या आधी पण असे प्रकार घडले आहेत. आणि हा विषय राजकीय नाही आहे. हा विषय सामाजिक आहे. NEET परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेले, जो मनस्ताप झाला त्याच्याशी संबंधित हा विषय आहे. आणि यात भारतीय जनता पक्षाचे समर्थक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनाच त्रास झालेला असणार. त्यामुळे आंदोलनाकडे राजकीय नजरेतून केंद्रातील सत्ताधारी पाहत आहेत, तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे.

सध्या पंडित नेहरूंपेक्षा किती जास्त दिवस तुम्ही पंतप्रधान पदावर बसले आहात याचा आनंद व्यक्त केला जात आहे . किती दिवस पंतप्रधानपद हा एक आकडा आहे दुसरं काही नाही! आज अशा विषयावर तुम्ही ठाम भूमिका घेऊन कृती केलीत तर त्या आकड्याला अर्थ आहे. आणि तरच तुम्हाला पुढची पिढी लक्षात ठेवेल. नाहीतर तो आकडा काय कामाचा ज्याने देशाच्या हातात काहीच पडत नाही !, असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहीलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!