माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुनर्वसन! राज्य सरकारने दिलं महत्वाचे पद….

पुणे : महायुतीच्या सरकरमधील मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
आता उपाध्यक्षांची संख्या तीन करण्यात आली आहे. नियोजन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. यामध्ये कृषी संलग्न क्षेत्र, आरोग्य आणि पोषण, लघुउद्योग, उद्योग अशा १० महत्त्वाच्या क्षेत्रांवर काम करण्यासाठी ‘मित्र’ ची स्थापना करण्यात आली आहे. यातून वेगवेगळे निर्णय घेण्यात येतात.
मित्रच्या कार्यक्षेत्रात कृषि आणि संलग्न क्षेत्र, आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कौशल्य विकास आणि नाविन्यता, नागरिकरण, बांधकाम क्षेत्र विकास आणि भूमी प्रशासन, वित्त, पर्यटन आणि क्रीडा, ऊर्जा संक्रमण आणि वातावरणीय बदल, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान, पूरक सेवा आणि दळणवळण या क्षेत्रांचा समावेश आहे. मंत्रिपद नाकारल्याने कार्यकर्ते नाराज झाले होते.
दरम्यान, मित्र संस्थेच्या नियामक मंडळाच्या रचनेत उपाध्यक्षांची संख्या ही दोन होती. या नव्या उपाध्यक्षांची मुदत आदेशाच्या दिनांकापासून दोन वर्ष अथवा पुढील शासन आदेश येईपर्यंत असेल, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. मित्र’च्या उपाध्यक्ष पदावर वळसे-पाटील यांच्यासह भाजपचे राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांना संधी देण्यात आली आहे.
‘मित्र’वर तीन उपाध्यक्ष नेमून सरकारने सत्तासमतोल साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत वळसे पाटील यांचे पुनर्वसन केले जाणार असल्याची चर्चा होती. एक मंत्रिपद रिक्त असल्याने ही चर्चा अजूनच वाढली होती, मात्र आता या पदावर वर्णी लागली आहे.