गार पाण्याची बाटली भरून न दिल्याने पतीकडून बेदम मारहाण; निराश विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या! चौघांवर गुन्हा दाखल

भोर : कामावर जात असताना गार पाण्याची बाटली भरून दिली नाही, या क्षुल्लक कारणावरून नवऱ्याने लाथाबुक्यांनी मारहाण केली. निराश झालेल्या विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भोर तालुक्यातील आळंदे येथून समोर आली आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरी दीपक राजेशिर्के (वय ३१, रा. आळंदे, ता.भोर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पती दीपक रामचंद्र राजेशिर्के (रा.आळंदे, ता. भोर), सासू प्रतिकला रामचंद्र राजेशिर्के (रा. आळंदे, ता.भोर), नणंद कल्याणी राजेंद्र राजेमहाडिक (रा. तारळे ता. पाटण) आणि उर्मिला उर्फ रसिका योगेश सुर्वे (रा.केडगाव, अहमदनगर) या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी गौरी यांच्या आई जयश्री मारुती कदम (वय ५५, रा. गोखलेनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत गौरी आणि दीपक राजेशिर्के यांचा १४ जून २०२३ रोजी प्रेमविवाह झाला. यानंतर थोडे महिने व्यवस्थित संसार चालला. त्यानंतर पती दीपक व सासू प्रतिकला हे मयत गौरीचे वारंवार मानसिक व शारीरिक छळ करू लागले. तसेच २०२३ दिवाळीमध्ये ‘तुझा पार्लरचा कोर्स झाला, तू तुझ्या घरच्यांकडून गावामध्ये पार्लरचे दुकान टाकण्यासाठी १ लाख रूपये घेऊन ये’, असे म्हणत पती दीपक, सासू प्रतिकला तसेच नणंद कल्याणी व उर्मिला हे चौघे जण गौरीला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले.

त्यानंतर शुक्रवारी (दि.५) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास गौरीने पती दीपक यास सकाळी कामावर जात असताना गार पाण्याची बाटली भरून दिली नाही, या क्षुल्लक कारणावरून लाथाबुक्यांनी खूप मारहाण केली. त्यानंतर जयश्री कदम यांनी मुलीची विचारपूस करण्यासाठी सायंकाळी साडेचार वाजता फोन केला असता गौरीच्या सासरच्या लोकांनी गौरी ही विहिरीत पाय घसरून पडून मृत्यू झाल्याचे सांगितले.

दरम्यान, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.