खाद्यप्रेमी आणि मद्यप्रेमींचे होणार वांदे! आज राज्यभर हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद, नेमकं कारण काय?, जाणून घ्या..

पुणे : खाद्यप्रेमी आणि मद्यप्रेमींचे आज हाल होणार असून कारण महाराष्ट्रातील बार आणि रेस्टॉरंट आज बंद राहणार आहे. राज्य सरकारच्या अन्यायकारक करवाढ धोरणाच्या निषेधार्थ, आज (ता.१४) रोजी महाराष्ट्रभर ‘आहार’ संघटनेच्या नेतृत्वाखाली हॉटेल, रेस्टॉरंट आणि परमिट रूम्स बंद ठेवण्यात येणार आहेत.

या आंदोलनामुळे राज्यातील तब्बल २०,००० हून अधिक हॉटेल्स आणि बारची दारे ग्राहकांसाठी बंद राहतील. इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन अर्थात ‘आहार’ संघटनेने या बंदची हाक दिली असून, सरकारच्या अवाजवी करवाढीविरोधात हे एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन आहे.
यामुळे हॉटेल व्यवसाय जगणाऱ्या लाखो कुटुंबांवर परिणाम होण्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे. आहार संघटनेचे अध्यक्ष सुधाकर शेट्टी यांनी सांगितलं की, राज्यातील हॉटेल व्यवसायावर सरकारने लादलेली करवाढ म्हणजे थेट ‘कर सुनामी’ आहे. व्हॅटमध्ये दुप्पट वाढ, परवाना शुल्कात १५% वाढ, आणि उत्पादन शुल्कात तब्बल ६०% वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, अशा स्थितीत व्यवसाय सुरू ठेवणं अशक्य बनलं आहे. सायंकाळी अनेक नागरिक रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी जातात किंवा घरपोच खाद्यपदार्थ मागवतात. मात्र आज सोमवारी अनेकांना याचा फटका बसणार आहे. कारण मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिकसह राज्यभरातील परवानाधारक हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट पूर्णपणे बंद राहणार आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने आहार संघटनेला दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. संघटनेला आपले प्रश्न कायदेशीर मार्गाने मांडण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र, संघटनेने आजचा बंद निर्णय कायम ठेवत सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.