11व्या मजल्यावर आगीचा तांडव! बाळाला वाचवताना केअरटेकरचाही अंत; विलेपार्ल्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं?


मुंबई : मुंबईच्या विलेपार्ले पश्चिम परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नानावटी रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या शांता भवन या 11 मजली इमारतीच्या 11व्या मजल्यावर रात्री सुमारे 10 वाजता आग लागली. या दुर्घटनेत एका लहान मुलासह घरातील केअरटेकरचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अग्निशमन दल आणि पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या 11व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 1102 मध्ये आग लागली. या फ्लॅटमध्ये इमारतीचे विकासक राहत असल्याची माहिती आहे. आग लागल्यानंतर काही वेळातच घरातील वस्तूंनी पेट घेतला आणि मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. त्यावेळी घरात काम करणारी अंकिता नावाची केअरटेकर विकासकाच्या नातवाला वाचवण्यासाठी धावली. तिने मुलाला आगीपासून वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रचंड धूर आणि आगीच्या कचाट्यात अडकल्याने दोघांनाही बाहेर पडता आले नाही. अखेर गुदमरून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या सुमारे दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुरुवातीला आगीची तीव्रता लेव्हल-1 होती. मात्र परिस्थिती झपाट्याने गंभीर होत गेल्याने रात्री 10.16 वाजता आग लेव्हल-2 म्हणून घोषित करण्यात आली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत बचावकार्य सुरू केले आणि मध्यरात्रीनंतर सुमारे 1 वाजता आग आटोक्यात आणण्यात यश आले.

या आगीचा फटका सुमारे 4 हजार चौरस फूट क्षेत्राला बसला. विद्युत वायरिंग, विद्युत उपकरणे, एसी युनिट, सोफा, पलंग, फॉल्स सीलिंग, स्वयंपाकघरातील भांडी तसेच घरातील इतर साहित्य जळून खाक झाले. आगीत एकूण आठ जण जखमी झाले. त्यापैकी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.

उर्वरित जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. सहा जणांना नानावटी रुग्णालयात, तर दोघांना कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कूपर रुग्णालयातील दोघांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. नानावटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे.

पोलिस अधिकारी आर. व्ही. भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग 11व्या मजल्यावरील निवासी फ्लॅटमध्ये लागली. प्राथमिक माहितीनुसार दोन फ्लॅटमधील विद्युत वायरिंग, एसी युनिट आणि घरातील साहित्य आगीच्या विळख्यात सापडले. मात्र आग नेमकी कशामुळे लागली, तसेच ती एवढ्या वेगाने कशी पसरली, याचा तपास सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका सेवा आणि संबंधित महापालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्यादरम्यान परिसरात मोठी गर्दी झाली होती. सध्या आगीच्या कारणाचा शोध घेण्याबरोबरच इमारतीतील अग्निसुरक्षा व्यवस्थेचीही पाहणी केली जात आहे.

विलेपार्ल्यातील या घटनेने पुन्हा एकदा उंच इमारतींमधील अग्निसुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आणला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी 11व्या मजल्यावर लागलेल्या आगीमुळे निर्माण झालेला धूर जीवघेणा ठरला आणि एका मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात केअरटेकरसह त्याचा करुण अंत झाला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!