शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणवर FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि मस्तानी दीपिका पादुकोण यांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. दोघेही सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. . राजस्थानातील भरतपूर येथे दोघांविरोधात FIR दाखल करण्यात आली असून, त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

एका व्यक्तीनं दोन्ही स्टार्स विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयानं शाहरुख-दीपिकाविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले, त्यानुसार दोन्ही स्टार्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?

भरतपूरमधील वकील कीर्ती सिंह यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेनंतर न्यायालयाने पोलिसांना शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्यासह काही इतरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. प्रकरण Hyundai Alcazar 1.5 Signature Car संबंधित असल्याचे समजते.

कीर्ती सिंह यांनी 2022 मध्ये सुमारे 23.97 लाख रुपये किंमतीची कार खरेदी केली होती. त्यासाठी त्यांनी एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसकडून कर्ज घेतले आणि त्यातील अर्धी रक्कम रोखीने भरली होती. मात्र, वाहनात गंभीर तांत्रिक दोषअसल्याचे पुढे आले.
वाहनात आलेल्या दोषाविषयी कंपनी आणि डीलरला कळवूनही कोणताही ठोस उपाय करण्यात आला नाही. वाहन बदलून देणे किंवा पैसे परत करणे, या दोन्ही मागण्या कंपनीने फेटाळल्या. तसेच तक्रारदाराचा आरोप आहे की, ग्राहकांना भुलवून दोषपूर्ण वाहन बाजारात आणण्यात आले.
दरम्यान, याच कारणावरून कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबतच, ब्रँड ॲपम्बेसेडर शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्यावरही ग्राहकांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. दोन्ही स्टार्स पूर्वी ओम शांती ओम, चेन्नई एक्सप्रेस यांसारख्या हिट चित्रपटांत झळकले असले तरी आता एका हायप्रोफाईल कायदेशीर वादात त्यांना सामोरे जावे लागणार आहे.