अर्थमंत्री महोदय नेमके काय चाललंय राज्यात? पैसे नाहीत म्हणून शेतकऱ्यांच्या योजना थांबवता अन्..: रोहित पवार अजितदादांवर कडाडले

पुणे : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ते म्हणाले, अर्थमंत्री महोदय नेमके काय चालले आहे आपल्या राज्यात? हा प्रश्न आज आवर्जून विचारावासा वाटतो.
एकीकडे निधी नाही म्हणून शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत, लाडकी बहीण योजनेत कपात, युवा प्रशिक्षण योजनेतील युवांना पगार नाहीत. तर दुसरीकडे जाहिराती करण्यासाठी शंभर कोटींच्या होर्डिंग उभारणीला मान्यता दिली जाते. हा निर्णयानुसार शासनाने शासकीय जागांवर स्वतः १०० कोटी खर्च करून डिजिटल होर्डिंग उभारायचे आहेत.
या होर्डिंगचे परिचालन आणि देखभाल करण्यासाठी खाजगी कंपनी नेमायची, त्याबदल्यात सरकारला १५% सरकारी जाहिराती देता येतील आणि ८५ % जाहिराती खाजगी असतील. शासनाचा हा निर्णय म्हणजे ‘सरकारने स्वतःच्या जागेवर स्वतः खर्च करून घर बांधायचे.
तसेच घराच्या एका कोपऱ्यात शासनाने राहायचे, घराची साफसफाई देखभाल खाजगी कंपनीने करायची, त्याबदल्यात उर्वरित संपूर्ण घर खाजगी कंपनीने भाड्याने द्यायचे’ असाच हा प्रकार आहे. हा निर्णय अर्थखात्याचा नसला तरी शेवटी जबाबदारी अर्थमंत्र्यांचीच आहे.
अर्थमंत्री शिस्तप्रिय आहेत, त्यामुळे अर्थमंत्री या निर्णयात लक्ष घालून आवश्यक ते बदल करून घेतील, ही अपेक्षा. असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवारांनी यांच्यावर निशाणा साधला आहे. आता अजित पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.