अखेर मुहूर्त ठरला! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘या’ तारखेला उद्‌घाटन, जाणून घ्या..


मुंबई : एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सप्टेंबर महिन्याअखेर पहिले विमान झेपावणार असल्याची माहिती समोर आली आहे.

येत्या ३० सप्टेंबर रोजी या भव्य विमानतळाचे लोकार्पण होणार असून, नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी या विमानतळाची तुलना थेट लंडनच्या ‘हीथ्रो’ विमानतळाशी करून त्याच्या भव्यतेची ग्वाही दिली आहे.

सध्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचंड प्रवासी दडपण आहे. नवी मुंबईतील नवीन विमानतळ सुरू झाल्याने हा ताण कमी होणार असून, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवासाचा वेळ वाचणार असून, थेट आणि सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार आहेत.

उलवे नोड, पनवेलजवळ ११६० हेक्टर क्षेत्रात उभारलेले हे विमानतळ वार्षिक ९ कोटी प्रवाशांना सेवा देऊ शकेल. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, नवीन तंत्रज्ञान आणि सुरक्षित वातावरण प्रवाशांना मिळणार आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, गोवा हायवे, जेएनपीटी बंदर आणि अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) यामुळे विमानतळाशी कनेक्टिव्हिटी सोपी होणार आहे. पनवेल रेल्वे स्टेशनला रिजनल हब म्हणून विकसित केले जात असून, पुणे व कोकणातून शटल सेवा सुरू होणार आहे.

एमएसआरटीसीकडून ठाणे, वाशी, दादर आणि पनवेल येथून थेट विमानतळापर्यंत एक्सप्रेस बस सेवा सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे, यामध्ये इलेक्ट्रिक बसना प्राधान्य दिले जाणार असून, पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

सिडकोकडून विमानतळाशी जोडणारा ९ किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधण्याचे काम सुरू आहे. याशिवाय खारघर, उलवे आणि पनवेलमध्ये नवीन टाउनशिप, बिझनेस पार्क आणि लॉजिस्टिक हब विकसित होत आहेत. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!