शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पुन्हा मिळणार २ हजारांची मदत; कोणत्या तारखेपासून खात्यात जमा होणार पैसे?

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पुन्हा एकदा प्रत्येकी २ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून या मदतीचे वाटप सुरू होऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप अंतिम अधिकृत घोषणा झालेली नाही.
दुष्काळामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारकडून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त आहे.


एक कोटी शेतकऱ्यांना मिळू शकतो दुसरा हप्ता

प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राज्यातील दुष्काळी तालुक्यांमधील सुमारे एक कोटी पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची आगाऊ मदत देण्यात आली होती. आता याच शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात २ हजार रुपयांची मदत देण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

१० लाख शेतकऱ्यांचे पैसे तांत्रिक कारणांमुळे अडकले
दरम्यान, सुमारे १० लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील मदत अद्याप मिळालेली नसल्याचे वृत्त आहे. शेतकरी ओळख क्रमांक नसणे, जमिनीची सामाईक मालकी आणि सातबाऱ्यावर वारसांची नावे नोंदवलेली नसणे अशा कारणांमुळे मदत रखडल्याचे सांगितले जात आहे. आवश्यक ई-केवायसी आणि कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना मदत मिळू शकते.
पैसे कधी जमा होणार?
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मदतीचे वाटप सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनापूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता सरकारच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे.
