भोरमध्ये पोलीस पाटलाची हत्या; घोरेपडळ-सांगवी बुद्रुकमध्ये घटनेने खळबळ, आरोपींचा शोध सुरू


पुणे : जिल्ह्यातील भोर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. घोरेपडळ-सांगवी बुद्रुक येथे कार्यरत असलेले पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांची अज्ञात व्यक्तींनी हत्या केली. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण भोर तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलीस पाटलाचीच हत्या झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

प्राथमिक माहितीनुसार, अशोक येनपुरे यांच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. हल्लेखोरांची संख्या किती होती आणि ही घटना नेमकी कोणत्या परिस्थितीत घडली, याबाबतही अधिकृत माहिती मिळालेली नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राजगड पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान

पोलीस पाटलाच्या हत्येमुळे परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गुन्ह्याचा छडा लावून आरोपींचा शोध घेणे आणि हत्येमागील नेमके कारण उघड करणे, हे राजगड पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलिसांच्या तपासातून या घटनेमागील सत्य समोर येण्याची अपेक्षा असून संपूर्ण भोर तालुक्याचे लक्ष आता या प्रकरणाच्या तपासाकडे लागले आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!