ऑनलाइन शॉपिंग करताय? जरा थांबा! एका चुकीमुळे खातं होऊ शकतं रिकामं; फसवणुकीचा नवा प्रकार उघड

पुणे : मुंबई असो वा अकोला, देशभरात ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. मात्र, याच संधीचा फायदा घेत सायबर भामट्यांनी ग्राहकांना फसवण्याचा नवा मार्ग शोधला आहे. ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली ग्राहकांच्या घरच्या पत्त्यावर बोगस पार्सल पाठवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोला जिल्ह्यातील या घटनेमुळे ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात राहणाऱ्या नरेश नालट यांच्यासोबत असाच प्रकार घडला. त्यांच्या घराच्या पत्त्यावर एक पार्सल आले. पार्सल स्वीकारल्यानंतर त्यांनी ऑनलाइन पेमेंट केले. मात्र, पार्सल उघडून पाहिले असता त्यातील पँट फाटलेली आणि अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे आढळले.


यानंतर त्यांनी संबंधित वस्तू रिटर्न करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण अशी कोणतीही वस्तू ऑर्डरच केली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरच्या पत्त्यावर अनोळखी व्यक्तीच्या नावाने बोगस पार्सल पाठवून ग्राहकांकडून पैसे उकळले जात असल्याचा संशय या घटनेमुळे व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाची तक्रार अकोला पोलिसांच्या सायबर सेलमध्ये प्राप्त झाली आहे. या घटनेनंतर सायबर सेलने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

ग्राहकांनी नेहमी विश्वसनीय वेबसाइटवरूनच ऑनलाइन खरेदी करावी. अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळावे. एखाद्या वेबसाइटवरून पहिल्यांदाच खरेदी करत असाल, तर शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडावा. पार्सल स्वीकारण्यापूर्वी त्यावरील ऑर्डर आयडी आणि बुकिंगची माहिती तपासून घ्यावी.
ऑनलाइन पेमेंट करताना पैसे संबंधित कंपनीच्या अधिकृत खात्यावरच जात आहेत ना, याची खात्री करावी. तसेच, आपल्या घराच्या पत्त्यावर अनोळखी व्यक्तीकडून पार्सल आले असल्यास घाईघाईने ते स्वीकारू नये. पार्सल कोणी पाठवले आहे, याची आधी खात्री करून घ्यावी. अशा प्रकारे सतर्कता बाळगल्यास संभाव्य आर्थिक फसवणूक टाळता येऊ शकते, असे आवाहन सायबर सेलने केले आहे.
