‘अजितदादांची जागा घेण्यासाठी एवढी घाई का?’ अंत्यविधी सुरू असतानाच रोहित पवारांचं ब्रँडिंग? भाजपच्या एका आरोपाने राजकारणात भूकंप!

मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता भाजपने त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राजकीय वारशावर दावा करण्यासाठी रोहित पवारांची प्रसिद्धी यंत्रणा अंत्यविधी सुरू असतानाच सक्रिय झाली होती, असा खळबळजनक आरोप भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. ‘जुना वारसा घेऊन नवीन पुतण्या येतोय’ या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
रोहित पवार यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेत ‘मफलर मॅन’चा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांचा मफलर घातलेला फोटो दाखवला होता. या छायाचित्रात फडणवीस यांच्यासोबत व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचे पुत्र रोहित सिंग दिसत आहेत. अजित पवार यांचे विमान याच कंपनीच्या मालकीचे होते. हा फोटो एका लग्नसमारंभातील असल्याचे सांगत, मुख्यमंत्र्यांचे विमान कंपनीच्या मालकाच्या कुटुंबाशी जवळचे संबंध असतील, तर अजितदादांना न्याय मिळेल का? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला होता.


भाजपने स्लाइड्स दाखवत केला गंभीर आरोप

रोहित पवारांच्या आरोपांनंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी काही स्लाइड्स दाखवत रोहित पवारांच्या प्रसिद्धी यंत्रणेवर निशाणा साधला. अजितदादांचे अंत्यविधी सुरू असतानाच रोहित पवार हे त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी सक्षम असल्याचे चित्र समाजमाध्यमांवरील पोस्टमधून उभे केले जात होते, असा दावा त्यांनी केला.

अजितदादांचे अंत्यसंस्कार पूर्ण होण्याआधीच त्यांच्या जागी स्वतःला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप बन यांनी केला. ‘जुना वारसा घेऊन नवीन पुतण्या येतोय’ अशा आशयाच्या पोस्ट प्रसिद्ध केल्या जात असल्याचे सांगत त्यांनी रोहित पवारांवर टीका केली. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाचा फायदा घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
साखर कारखान्याची चौकशी करण्याची मागणी
याच पत्रकार परिषदेत रोहित पवारांच्या साखर कारखान्याच्या चौकशीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. कारखान्यामुळे विमान अपघाताच्या वेळी दृश्यमानता कमी झाली होती का, तसेच यामागे रोहित पवारांच्या सांगण्यावरून काही घडले होते का, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नवनाथ बन यांनी केली. वैभव सोलणकर यांनी यासंदर्भात पत्र दिले असून, त्याची चौकशी करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
एकीकडे रोहित पवार विमान कंपनी आणि फडणवीस यांच्या संबंधांवर प्रश्न उपस्थित करत आहेत, तर दुसरीकडे भाजपने त्यांच्या राजकीय भूमिकेपासून साखर कारखान्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला हा संघर्ष आता राजकीय वारशाच्या लढाईपर्यंत पोहोचला आहे. या आरोपांवर रोहित पवार काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
