‘अजितदादांना अटकेच्या धमक्या देऊन महायुतीत आणलं’; ७० हजार कोटींच्या आरोपांवरून अमित शाहांना माफी मागण्याची मागणी, संजय राऊतांचा घणाघात


मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर उपस्थित झालेले प्रश्न आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ‘मफलर मॅन’चा मुद्दा, अपघाताची एफआयआर, तपासाची दिशा आणि अजितदादांवर झालेले ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप… या सगळ्यांवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला धारेवर धरले. अजित पवार यांना महायुतीत आणण्यासाठी अटकेच्या धमक्या देण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. मुंबईत मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना राऊत यांनी ढोंगीपणाचे प्रदर्शन असल्याचे म्हटले. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात अद्याप एफआयआर का दाखल झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इतर प्रकरणांत तत्परतेने गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले जातात; मग या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ का, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

या प्रकरणाच्या तपासाची फाईल अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस दाबत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. अजित पवार यांच्या मृत्यूचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडून होऊ शकत नाही का, अशी विचारणा करत त्यांनी तपास पारदर्शकपणे झाला असता तर संशय निर्माण झाला नसता, असे म्हटले.

रोहित पवार यांनी समोर आणलेल्या ‘मफलर मॅन’च्या मुद्द्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांनी अपघातावेळी वापरलेल्या विमानाच्या कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मफलर घालून हसत वावरत असल्याचे रोहित पवार यांनी दाखवले, असे ते म्हणाले. या छायाचित्रांमुळे उपस्थित झालेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राऊत यांनी केली. विमान कंपनीच्या कामकाजाबाबतही प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दुसरीकडे, अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आणि जरंडेश्वर साखर कारखान्यातील गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांचा उल्लेख करत राऊत म्हणाले की, अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यापूर्वी अमित शाह यांनी त्यांची माफी मागायला हवी होती. अजित पवार स्वतःहून महायुतीत आले नव्हते; ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या कारवाईची तसेच अटकेची भीती दाखवून त्यांना महायुतीत आणण्यात आले, असा दावा त्यांनी केला.

‘तुमच्याकडे कोणी मनापासून येत नाही, कोणी तुमचे खरे मित्र नाहीत,’ अशा शब्दांत राऊत यांनी भाजपवर टीका केली. सत्ताधाऱ्यांचे संबंध स्वार्थासाठी असून भ्रष्टाचारी आणि जमीनदारांशीच त्यांचे नाते असल्याचा आरोपही त्यांनी केला. अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत राऊत यांनी या प्रकरणावरून भाजपला पुन्हा लक्ष्य केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!