अखेर भारताने करून दाखवलं! रचला नवा अध्याय, भारताचे ‘चांद्रयान- ३’ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग..
नवी दिल्ली : संपूर्ण भारतासाठी आनंदाची बातमी आहे. भारताची चांद्रयान-3 मोहीम यशस्वी ठरली आहे. चांद्रयान- 3 चंद्रावर उतरले आहे. त्यामुळे इस्रोच्या वैज्ञानिकांच्या मेहनतीला फळ मिळाले आहे. चांद्रयान-3 मधील लँडर आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे. त्यामुळे जगभरात भारताची शान वाढली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताला चंद्रमोहीमेसाठी खूप कमी खर्च आला आहे.
लँडर मॉड्यूलच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या. त्यामुळं ही मोहीम देखील यशस्वीपणे पार पडणार असल्याचा विश्वास इस्रोनं व्यक्त केला. या मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला चंद्राबाबत मोलाची माहिती मिळाली.
पॉवर डिसेंटला सुरुवात.. !
5.44 वाजता : इस्रोच्या मिशन कन्ट्रोलनं लँडर मॉड्यूलला पॉवर डिसेंटची कमांड दिली. यानंतर लँडर मॉड्यूलनं चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया सुरू केली. पुढे चार टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडली. यातील पहिला टप्पा हा रफ ब्रेकिंग फेजचा होता.
रफ ब्रेकिंग फेज पूर्ण…
5.56 वाजता : लँडर मॉड्यूलची रफ ब्रेकिंग फेज यशस्वीपणे पूर्ण झाली. यानंतर अल्टिट्यूड होल्डिंग फेज सुरू करण्यात आली. यामध्ये विक्रम लँडर हे चंद्रापासून 7.4 किलोमीटर उंचीवरून आणखी खाली नेऊन 6.8 किमी उंचीवर नेण्यात आली, हा टप्पा केवळ 10 सेकंदांचा होता.