‘मुंढे पॅटर्न’चा आणखी एक मोठा स्फोट! फ्रुटी-कॅन्डीच्या गोदामात FDA ची मध्यरात्री धाड, 11 तासांच्या तपासणीत धक्कादायक प्रकार उघड


मुंबई : अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेने आता मोठ्या कंपन्यांनाही घेरायला सुरुवात केली आहे. डॉमिनोज पिझ्झाच्या आउटलेट्सवर कारवाई करून राज्यभर चर्चेत आलेल्या एफडीएने गुरुवारी मुंबईतील चेंबूर परिसरात असलेल्या एका मोठ्या पेय वितरण केंद्रावर छापा टाकत तब्बल 11 तास तपासणी केली. या कारवाईत मुदत संपलेल्या शीतपेयांचा आणि ज्यूसचा साठा आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी तातडीने माल जप्त केला.

13 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुरू झालेली ही कारवाई पहाटेपर्यंत सुरू होती. एफडीएच्या आठ सदस्यीय पथकाने गोदामातील प्रत्येक विभागाची तपासणी केली. तपासादरम्यान फ्रुटी, अॅपे फिज, कॅन्डी ज्यूस आणि इतर पेयांच्या बाटल्यांचा मोठा साठा पाहण्यात आला. यामधील काही उत्पादने मुदतबाह्य झाल्याचे आढळून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांचा साठा जप्त केला. जप्त मालाची किंमत एक लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.

कारवाईनंतर संबंधित गोदामावर सील ठोकण्यात आले. तसेच मालाची वाहतूक करणारी दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. एफडीएच्या परवानगीशिवाय या ठिकाणाहून कोणत्याही प्रकारच्या उत्पादनाची विक्री किंवा वितरण करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तपासासाठी गोळा केलेले नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले असून अहवालानंतर पुढील कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, याच आठवड्यात एफडीएने डॉमिनोजच्या अनेक शाखांवर धडक तपासणी करत परवाने निलंबित केले होते. स्वच्छतेचा अभाव, अन्न साठवणुकीतील त्रुटी, पिण्याच्या पाण्याची निकृष्ट व्यवस्था आणि नियमभंगाच्या तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या ब्रँड्सवरही कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश एफडीएने दिला आहे.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारात खाद्यपदार्थ आणि पेयांची विक्री वाढत असताना ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेमुळे राज्यातील अनेक मोठ्या कंपन्या आणि खाद्यव्यवसायिक सतर्क झाले असून पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!