अहमदनगरला कांद्याला मिळतोय चांगला भाव! शेतकऱ्यांत बाजारभावाने समाधान…


अहमदनगर : जिल्ह्यात कांद्याचे भाव आता चांगलेच वाढू लागले आहेत. कांद्याची आवक कमी होत असल्याने कांद्याचे बाजार तेज होताना दिसत आहे. कांद्याला मिळालेल्या भावाने शेतकऱ्यांत मात्र चांगले समाधान आहे.

नगर जिल्ह्यातील विविध बाजार समितीत कांद्याचे भाव आता चाळीशीच्या वर गेलेत. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपवाजारातील कांदा मार्केटमध्ये गुरुवारी (दि.२२) उच्चप्रतिच्या कांद्याला विक्रमी ४७०० रुपये भाव मिळाला. त्यामुळे कांदाउत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नेप्ती कांदा मार्केटमध्ये गुरुवारी (दि.२२) तब्बल ३२५ ट्रक भरून कांद्याची आवक झाली होती. ६५ हजार ९९ गोण्यांमध्ये ३५ हजार ८०६ क्विंटल कांदा विक्रीला आला.

या पैकी १ नंबर कांद्याला ३८०० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला ३००० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल, ३ नंबर कांद्याला २३०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल आणि ४ नंबर कांद्याला १५०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.

याशिवाय उच्चप्रतीच्या ११ गोण्या कांद्याला ४७००, ४२ गोण्या कांद्याला ४६०० तर १०४ गोण्या कांद्याला ४५०० एवढा उच्चांकी भाव मिळाला आहे. कांद्याचे भाव वाढू लागले असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आता जुळून येणार आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा नासला असल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहे. यावर्षी कांदा उत्पादनात घट झाली आहे.

तसेच गेल्या काही दिवसांत कांदा खराब होऊ लागल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना जागेवरच कांदा विकला आहे. त्यामुळे बाजार समितीत कांद्याची आवक घटल्याने दर वाढले असल्याचे म्हटले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!