पुण्यात बायकांकडून बनावट नोटांचा धंदा, खोट्या नोटा मशीनलाही ओळखता येईनात, आरोपींना अटक..


पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह पाच जणांना अटक केली आहे. आरोपी पुण्यात बनावट नोटांचा होलसेल धंदा करत होते. १ लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात आरोपी दोन लाखांच्या बनावट नोटा विकत होते. अशी माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी आरोपींकडून नोट छपाईच्या प्रिंटर, शाई, कोऱ्या कागदासह २८ लाख ६६ हजार रुपये किमतीच्या बनावट आणि दोन लाखांच्या खऱ्या नोटा जप्त केल्या आहेत. या टोळीचे परराज्यातही धागेदोरे असून, रॅकेटमध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या नोटा इतक्या हुबेहूब होत्या की बँक कर्मचाऱ्यांना देखील या बनावट असल्याचं समजत नव्हतं.

शिवाजीनगर पोलिसांच्या सायबर पोलिसांना या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आलं आहे. यामध्ये मनीषा ठाणेकर, सचिन यमगर, नरेश शेट्टी, भारती गावंड आणि प्रभू गुगलजेड्डी अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. संबंधित टोळी एक लाख रुपये घेऊन दोन लाखांच्या बनावट नोटा देत असल्याची माहिती तपासात उघड झाली. या टोळीत सामील असलेल्या अन्य आरोपींच्याही मागावर पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातील एका बँकेत सीडीएममधून दोनशे रुपयांच्या बनावट चलनी नोटा जमा केल्या होत्या. या नोटा इतक्या हुबेहूब होत्या की मशीनला देखील त्या बनावट असल्याचं समजू शकलं नाही. ज्यावेळी ही बाब बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

यानंतर पोलिसांनी संबंधित रक्कम कोणत्या खात्यात जमा केली, याचा तपशील काढला.. यावेळी मनीषा ठाणेकरनं या नोटा दिल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी ठाणेकरला चौकशीसाठी बोलावून घेत अटक केली. ठाणेकरची चौकशी केली असता या रॅकेटमध्ये इतर पाच जणांचा देखील सहभाग असल्याचं समोर आलं.

याच माहितीच्या आधारे पोलिसांनी पुण्यातलं बनावट नोटांचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. या घटनेनं मात्र खळबळ उडाली असून मशीनला सुद्धा या नोटा समजत नसतील तर मग परिस्थिती अवघड असून सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावर खोट्या नोटा असल्याचे दिसून येते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!