बारामतीतील व्यावसायिकाला पुण्यात कारच्या काचेवर चिठ्ठी लावून १० लाखांची खंडणी मागणार्याला बेड्या; गुन्हे शाखेच्या युनिट २ ची कारवाई..

पुणे : बारामती येथील व्यावसायिक पुण्यात जेवायला आले असताना त्यांच्या कारला चिठ्ठी लावून १० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. कारच्या काचेवर चिठ्ठी लावून१० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने अकलुज तालुक्यातील उंबरे गावातून बेड्या ठोकल्या आहेत.
श्रीनाथ यलाप्पा शेडगे (वय २५, रा. मु. पो. उंबरे, ता. अकलुज, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तो पुण्यात झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, बारामतीमधील व्यावसायिक कोरेगाव पार्क येथील हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आले होते. जेवण करुन बाहेर आले असता त्यांच्या कारला एक पाकिट चिटकवलेले आढळून आले. त्यात तुम्ही १० लाख रुपये दिले नाही तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला जीवे मारून टाकेल अशी धमकी दिली होती.
फोन करुन त्यांना जेवणाच्या डब्यात पैसे टाकून ते कोरेगाव पार्क येथे आणून देण्याची धमकी दिली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास युनिट २ चे पथक करत होते. पोलीस अंमलदार गजानन सोनुने व पुष्पेद्र चव्हाण यांना धमकी देणारा आरोपी हा अकलुज येथे असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस पथकाने अकलुज पोलिसांच्या मदतीने शेडगे याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून कर्जबाजारी झाला असल्याने त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले. पुढील तपासासाठी त्याला कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.