मेट्रोचा विस्तार यवत पर्यंत करा, पुणे रिंगरोड, प्रस्तावित उन्नत महामार्गाची कामे वेळेत पूर्ण करा – आमदार ॲड. राहुल कुल यांची विधानसभेत आक्रमक मागणी….

पुणे : पुणे शहर व उपनगरांतील दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी गंभीर समस्या बनली आहे. या प्रश्नाची दखल घेत आमदार ॲड. राहुल कुल यांनी महाराष्ट्र विधानसभेत आज लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधले. या चर्चेदरम्यान त्यांनी या प्रश्नावर सखोल भाष्य करत अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.

ॲड. राहुल कुल म्हणाले की, पुणे शहर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक आणि आयटी हब असून येथील लोकसंख्या आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यानुसार वाहतूक व्यवस्थेचा विकास झाला नसल्यामुळे सामान्य नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. या कोंडीमुळे वेळ वाया जातो, प्रदूषण वाढते आणि अपघाताचाही धोका निर्माण होतो.
आमदार कुल यांनी सांगितले की, पुणे परिसरातील वाहतूक समस्या ही दोन स्तरांवर विभागली जाऊ शकते. एक म्हणजे शहराच्या आतली वाहतूक, आणि दुसरी म्हणजे शहराच्या बाहेरील – म्हणजेच उपनगरातील आणि बाह्य भागातील वाहतूक. विशेषतः हडपसर ते यवत आणि पुणे – ते शिरूर (अ. नगर) मार्गावरील वाहतूक हा खूप मोठा प्रश्न आहे. त्या मार्गांवर उन्नत मार्ग (फ्लायओव्हर) रस्ते बांधण्याची कामे मंजूर करण्यात आली असून, त्याच्या निविदा देखील झालेल्या आहेत. हि कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करावीत अशी मागणी त्यांनी केली.

तसेच पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम देखील वेळेत पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी राज्य सरकारने चार वर्षांचा कालावधी अपेक्षित असल्याचे उत्तर दिले आहे. पुणे ते यवत दरम्यान उन्नत मार्गावर लोणीकाळभोर पर्यंत प्रस्तावित असलेली मेट्रो यवत, ता. दौंड पर्यंत करावी अशी मागणी देखील आमदार कुल यांनी यावेळी केली आहे.

वाहतूक कोंडीसारख्या स्थानिक प्रश्नांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी दरमहा विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त आणि संबंधित लोकप्रतिनिधी यांच्यात बैठक घेण्याची गरज आहे, तसेच या कामातील त्रुटी दूर करण्यासाठी विशेषज्ञांची नेमणूक करण्याची गरज आहे. असे आमदार कुल यांनी सांगितले. “सर्वसामान्य नागरिक या समस्येने त्रस्त असून, आम्हा लोकप्रतिनिधींना यावर वारंवार प्रश्न विचारले जातात.
त्यामुळे हे केवळ प्रशासकीय नाही, तर सामाजिक दायित्वाचेही काम आहे,” असे ते म्हणाले. स्मार्ट सिटी योजनेचा उद्देश चांगला असूनही त्याची अंमलबजावणी सुसंगत नसल्याचेही आमदार कुल यांनी यावेळी स्पष्ट केले. “पुण्यात स्मार्ट सिटीच्या नावाखाली सुंदर फूटपाथ तयार करण्यात आलेत, पण त्याचवेळी रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे वाहनधारकांची अडचण वाढली आहे,” असे म्हणत त्यांनी या योजनेतील विसंगतीकडे लक्ष वेधले.
या मागणीवर मंत्री दादा भुसे यांनी पुणे रिंगरोड प्रकल्प, हडपसर-यवत आणि पुणे-शिरूर उन्नत मार्ग व पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम वेळेत पूर्ण केले जातील. प्रकल्पांच्या प्रगतीसाठी राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली जाईल. प्रकल्पातील विविध अडचणी व सुधारणा यासाठी मासिक आढावा बैठक नियमितपणे घेण्यात येईल. असे आश्वासन दिले.
सभागृहात आक्रमक पवित्रा…
या चर्चेदरम्यान पीठासीन अधिकारी यांनी ‘प्रश्न विचारा’ असे सूचित केल्यावर ॲड. राहुल कुल अधिक आक्रमक होत म्हणाले, “मी इतरांसारखा फक्त भाषणबाजी करत नाही, तर सकाळी ९:३० वाजता सभागृहात येतो आणि जनतेचे खरे प्रश्न मांडतो. हाच माझा लोकप्रतिनिधी म्हणून खरा पवित्रा आहे.” त्यांच्या या ठाम भूमिकेने सभागृहाचे लक्ष वेधले.