बंडखोरी करणं भोवलं, भोर मतदार संघातील भाजपचे बंडखोर नगरसेवक किरण दगडे यांची पक्षातून हकालपट्टी, प्रवीण दरेकर यांनी दिली माहिती..

पुणे : राज्यात निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. अर्ज माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झालं आहे. बंडखोरांनी दोन्ही आघाड्यांची डोकेदुखी वाढवली आहे. अनेक जण निवडणूक रिंगणात असून त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही. दरम्यान, भाजपने पक्षातील बंडखोरांविरोधात मोठी कारवाई केली आहे.
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या ४० जणांची भाजपने पक्षातूनच हकालपट्टी केली आहे. सर्वच बंडखोरांची हकालपट्टी केल्याचे स्पष्ट करताना भोर मधील भाजपचे बंडखोर नगरसेवक किरण दगडे यांची देखील हकालपट्टी केल्याचे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
दरम्यान प्रदेश भाजपने आज बंडखोरी करणाऱ्या चाळीस जणांची पक्षातूनच हकालपट्टी केली आहे. मात्र यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या यादीत भोर मतदार संघातील उमेदवार किरण दगडे यांच्या नावाचा उल्लेख नाही. यामुळे राष्ट्रवादी चे कार्यकर्ते तक्रार करत आहेत.
दरम्यान, याबाबत पुण्यात पत्रकार परिषदेसाठी आलेले भाजप नेते प्रवीण दरेकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले आमच्या पक्षाने सर्वच बंडखोरांची हकालपट्टी केली आहे, त्यामध्ये किरण दगडे देखील येतात. राज्यात पुन्हा सत्ता आणण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते अधिकृत उमेदवारांचा प्रचार करत आहेत.