इंदापूर तालुक्यातील भवानीनगरमध्ये खळबळ!! तरुणाच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार, तरुणांमध्ये कायद्याचा धाक संपला?

भवानीनगर : इंदापूर तालुक्यातील भवानीनगर मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भवानी नगरच्या महाविद्यालयापासून काही अंतरावर असलेल्या भवानीमातेच्या मंदिरासमोर अचानक दोन गटात हाणामारी झाली. यामुळे अचानकच घडलेल्या या गोष्टीने सगळेच हादरले.

या घटनेत कोयत्याने एका जणाच्या डोक्यात बेछुटपणे वार केले. ही घटना पाहून बाजारपेठेत असलेले पालक देखील हादरून गेले.
पाहता क्षणी अंगावर काटा येईल अशा पद्धतीने ही मारामारी झाली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
बारामती मधील काही घटना किंवा पुण्यातील काही घटना आणि आता इंदापूर तालुक्यातील या घटना लक्षात घेता पोरांना कशाचीच भीती आणि धाक उरलेला नाही. अंगावर वार झाल्यानंतर तातडीने एका जणाला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र यावेळी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

याचवेळी आता तर मर्डर करणार. अशी कुजबुज सुरू होती. मुला मुलांमध्ये गॅंगवॉर होऊ लागल्याने पोलिसांनी अतिशय गांभीर्याने व अधिक कठोरपणे हे वेळीच थांबवण्याची आवश्यकता असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे. यामुळे पोलीस काय कारवाई करणार हे लवकरच समजेल.
अगदी 18 ते 20 वय असलेलं हे तरुण असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मिसरूड न फुटलेल्या पोरांची जीव घेण्यापर्यंत मजल जात असल्याने आता खरोखरच यावर जर कठोर कारवाई झाली नाही, तर गावागावात आणि वाड्यावस्त्यांवर देखील एकमेकांचा जीव घेण्याचे लोण पोचण्याची शक्यता आहे.