अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताचा सगळाच होणार उलगडा, ब्लॅक बॉक्समधून अखेर महत्त्वाची माहिती समोर..

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला? क्रॅश होण्यापूर्वी विमानातील पायलटनी काही संदेश दिला होता का? हे रहस्य आता उलगडणार आहे. कारण या विमानातील ब्लॅक बॉक्समधील सर्व डेटा आता मिळवण्यात आला आहे.
अपघातग्रस्त विमानाच्या फ्रंट ब्लॅक बॉक्समधून २४ जून रोजी ‘क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल’ सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. यानंतर, २५ जून रोजी मेमरी मॉड्यूल यशस्वीरित्या एक्सेस करून त्यातील संपूर्ण डेटा एएआयबीच्या प्रयोगशाळेत डाउनलोड करण्यात आला.
सध्या कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर या दोन्हीमधील डेटाचे विश्लेषण सुरू आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या तपासाचा मुख्य उद्देश अपघातामागील कारणांचा शोध घेणे हा आहे.
तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि विमान वाहतूक सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या घटकांची ओळख पटवणे हे देखील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. ‘ब्लॅक बॉक्स’ हे प्रत्येक विमानात बसवलेले एक अत्यंत महत्त्वाचे उपकरण असते, जे विमानाच्या उड्डाणादरम्यानच्या सर्व महत्त्वपूर्ण माहितीचा मागोवा ठेवते.
तसेच व्यावसायिक विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ब्लॅक बॉक्समध्ये मुख्यत्वे दोन भाग असतात. यातील पहिला भाग म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर, जो विमानाचा वेग, उंची, दिशा यासारख्या अनेक तांत्रिक बाबींची नोंद ठेवतो.
दुसरा भाग कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर असतो, जो कॉकपिटमधील वैमानिकांचे संभाषण, एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबतचे संवाद आणि इतर सर्व आवाजांची नोंद करतो. हा डेटा मेमरी चिप्समध्ये साठवला जातो. ब्लॅक बॉक्स अत्यंत मजबूत बनवलेला असतो, जेणेकरून तो भीषण अपघात, आग आणि पाण्याच्या दाबालाही सहन करू शकेल आणि त्यातील डेटा सुरक्षित राहील.