अख्खा महाराष्ट्र हवामानाच्या कचाट्यात… पुढचे चार दिवस उष्णतेची लाट की पावसाचा कहर? हवामान विभागाचा मोठा इशारा

मुंबई : राज्यातील बदलत्या हवामानामुळे नागरिक पूर्णपणे गोंधळून गेले आहेत. एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे अचानक पावसाच्या सरी कोसळत असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. कधी कूलर आणि एसीची गरज भासते, तर काही क्षणांतच छत्री शोधण्याची वेळ येत असल्याने वातावरणाचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेचा प्रभाव वाढू लागला असून घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत. अशातच हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील कमाल तापमान पुढील चार दिवसांत २ ते ३ अंशांनी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
विदर्भात उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थितीनंतर बुधवारी बहुतांश भागांमध्ये कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी घट झाली. मात्र आगामी दिवसांत पुन्हा तापमान वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. शनिवारपासून राज्यातील पावसाचा प्रभाव हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.

मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये शनिवारपर्यंत अशीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच गुरुवार आणि शुक्रवारी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, बुधवारी कोकणातील सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे ३४.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. मुंबईतील सांताक्रूझ केंद्रात ३३.९ अंश, तर कुलाबा केंद्रात ३३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश, तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे