एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणणार, संजय राऊत यांचा मोठा दावा; म्हणाले, आमचे पेढे…


मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. राज्यात विधान परिषदेच्या १० जागांसाठी राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला असून, येत्या १२ मे रोजी विधानपरिषदेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. तर यासाठी येत्या ३० एप्रिलला अर्ज दाखल केला जाणार आहे.

महाविकासआघाडीकडून अद्याप कोण विधानपरिषदेच्या रिंगणात उतरणार हे निश्चित झालेले नाही. त्यामुळे विविध तर्क वितर्क सुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नेहमीच्या शैलीत महायुतीवर हल्लाबोल करत महाविकासआघाडीच्या रणनीतीबाबत मोठे विधान केले आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी विधानपरिषदेच्या जागांसाठी उद्धव ठाकरे उमेदवार असणार का, त्यांच्या नावाचे पेढे खायला मिळणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले. विधान परिषदेवर जाण्याबद्दल उद्धव ठाकरे नक्की भूमिका स्पष्ट करतील. यासाठी उमेदवारी अर्ज भरावाच लागेल, तेव्हा तुम्हाला आमंत्रित करू. सर्व व्यवस्थित होणार आहे, तुम्हाला पेढे मिळतील, असे संजय राऊत म्हणाले.

त्यावर पत्रकारांनी कोणाच्या नावाचे पेढे मिळणार? असा प्रश्न विचारला. त्यावर संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले, ते नाव तुम्हाला नक्की कळेल. अनेक लोकांचे नाव पेढे वाटायचे आहेत. भाजप, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट सर्वांचे पेढे तुम्ही खा. आमच्याच पेढ्यावर तुमचं लक्ष का? असा मिश्किल सवालही केला.

या निवडणुकीत होणाऱ्या गुप्त मतदानावरून संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे हे इतके महान सद्गृहस्थ आहेत की ते भाजपची मतंही फोडू शकतात. अमित शाहांनी घडवलेला तो इतका मोठा माणूस आहे.

देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी ते भाजपची मतंही फोडू शकतात. ते सुपरपॉवर आहेत. प्रत्येकाने आपापली मतं सांभाळावीत. कारण हे मतदान गुप्त होणार आहे. कोणीही कोणाचा नसतो. सर्व पैशांचे आहेत, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!