मिठी नदी गाळ उपसा घोटाळाप्रकरणी डिनो मोरियाच्या घरावर ईडीची छापेमारी, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. याच प्रकरणात आता ईडीनं मोठा कारवाई केली आहे. आज सकाळी दिनो मोरियाच्या घरावर ईडीनं छापा टाकाला आहे. त्यामुळं आता दिनो मोरियाचा पाय आणखी खोलात जात असल्याचं दिसत आहे.
सकाळी 8 वाजल्यापासून डिनोच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरू आहे. याप्रकरणी त्याची याआधी मुंबई पोलिसांकडून चौकशीसुद्धा करण्यात आली होती. डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो यांना काही कागदपत्रांसह उपस्थित राहण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेनं सांगितलं होतं.
डिनो मोरिया हा शिवसेना (ठाकरे गट) युवानेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो. मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी ईडीने 15 हून अधिक ठिकाणी छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. यात मुंबई आणि केरळमधील कोची इथल्या ठिकाणांचा समावेश आहे. महापालिका निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.
याप्रकरणी तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थ आणि दोन कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गैरव्यवहारामुळे पालिकेला 65 कोटी 54 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप आहे.
डिनो मोरिया आणि त्याच्या भावाची आर्थिक गुन्हे शाखेनं जवळपास आठ तास चौकशी केली होती. याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी केतन कदम आणि डिनो मोरिया यांच्यात 2019 आणि 2022 या कालावधीत अनेक आर्थिक व्यवहार आहेत. त्याबाबत आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करत आहे.