धक्कादायक! रावसाहेब दानवेंच्या बंगल्यावर चोरट्यांचा डाव; कुलूपे तोडून घुसण्याचा प्रयत्न, जालन्यात खळबळ

जालना : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी बंगल्यात प्रवेश करण्यासाठी दरवाज्यांची तोडफोड केल्याचे उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री निवासस्थान बंद असताना काही अज्ञात व्यक्तींनी घरात शिरण्याचा प्रयत्न केला. मुख्य प्रवेशद्वार तसेच आतील एका दरवाज्यावरील कुलूप तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चोरट्यांना घरातील आतील भागात प्रवेश मिळाला नसल्याचे समोर आले आहे.
सोमवारी सकाळी घराची देखभाल करणारे कर्मचारी नेहमीप्रमाणे बंगल्यावर पोहोचले असता त्यांना दरवाज्याजवळील तोडफोड निदर्शनास आली. दरवाज्याचा काही भाग उचकटलेला दिसून आला, तसेच लाकडी चौकटीचे तुकडेही खाली पडलेले होते. यानंतर तातडीने संबंधितांना माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. प्राथमिक तपासात घरातील कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीला गेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चोरट्यांचा डाव अयशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे.

या घटनेमुळे शहरात चर्चांना उधाण आले असून एका वरिष्ठ नेत्याच्या निवासस्थानालाच चोरट्यांनी लक्ष्य केल्याने सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस विविध धागेदोरे तपासून आरोपींचा शोध घेत आहेत.