श्रावणात मांसाहार मागितला अन् वाद पेटला; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू, आई-वडील अटकेत


पुणे: पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात मांसाहारी जेवण मागण्यावरून झालेल्या वादाचे गंभीर परिणाम झाले. श्रावण महिन्यात दारूच्या नशेत घरी आलेल्या मुलाने मांसाहारी जेवणाची मागणी केल्याने आई-वडिलांशी वाद झाला. या वादातून वडिलांनी मुलाला मारहाण केल्याचे पोलिस तपासात समोर आले असून, त्यात मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

विशेष म्हणजे, मुलाच्या मृत्यूची माहिती आईने लपवण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी आई-वडिलांना अटक केली आहे.

महेश भागवत गायकवाड (वय 30, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर भागवत सूर्यभान गायकवाड (वय 64) आणि पार्वती भागवत गायकवाड (वय 30) अशी अटक करण्यात आलेल्या त्याच्या आई-वडिलांची नावे आहेत. याप्रकरणी महेशचा भाऊ गणेश भागवत गायकवाड (वय 34) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेशला दारूचे व्यसन होते. तो कोणतेही काम करत नव्हता. दारू पिऊन तो आई-वडिलांकडे जेवण्यासाठी जात असे. दारूच्या नशेत आल्यानंतर तो मांसाहारी जेवणाची मागणी करत असे. मात्र, श्रावण महिना सुरू असल्याने आई-वडील मांसाहार बनवून देत नसल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होते.

सोमवारी (ता. 24) रात्री महेश दारूच्या नशेत घरी आला. रात्री साडेदहाच्या सुमारास मांसाहारी जेवणाच्या मागणीवरून त्याचे आई-वडिलांशी पुन्हा भांडण झाले. या वादातून वडिलांनी महेशला मारहाण केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

पहाटे साडेचारच्या सुमारास महेशची आई पार्वती हिने त्याचा भाऊ गणेश याला झोपेतून उठवले. ‘महेश उठत नाही, त्याचे शरीर थंड पडले आहे,’ असे सांगून तिने गणेशला त्याला पाहण्यास सांगितले.

गणेशने महेशच्या घरी जाऊन पाहिले असता तो उताणा अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या डोक्याखाली हात घातला असता गणेशच्या हाताला रक्त लागले. तसेच महेशच्या डोक्याला, नाकाला आणि तोंडाला दुखापत झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. प्राथमिक तपासात महेशचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याचे वडील भागवत गायकवाड आणि आई पार्वती गायकवाड यांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास वारजे माळवाडी पोलिस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!