दीनानाथने गरीब रुग्णांचा ३० कोटींचा निधी वापरलाच नाही; चौकशी अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर..

पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवतीचा मृत्यू झाला. यामुळे संतापाची लाट उसळली आहे. या धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना उपचार दिले जातात की नाही, हे पाहण्यासाठी धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने रुग्णालयाला भेट देऊन अहवाल शासनाला सादर केला आहे.
यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठीचा ३० कोटींपेक्षा अधिक निधी वापरलाच नसल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. रुग्णालयाने धर्मादाय रुग्णालयांसाठीच्या नियमावलीचे पालन केले नसल्याचा ठपका समितीने ठेवला आहे. अहवालात संबंधितांचे जबाबही आहेत. या अहवालानंतर शासन काय कार्यवाई करणार हे लवकरच समजेल.
गरीब रुग्णांना चांगले उपचार मिळावेत, यासाठी या रुग्णालयांत विशिष्ट प्रमाणात बेड्स आरक्षित असतात. धर्मादाय रुग्णालयांसाठी योजना आखून देण्यात आली आहे. निर्धन, गरीब रुग्णांसाठी २० टक्के बेड्स राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्यात ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख ८० हजारांपर्यंत आहे, अशा रुग्णांकरिता १० टक्के बेड्स आरक्षित आहेत.
त्यांच्यावर मोफत उपचार करणे अपेक्षित आहे. धर्मादाय सहआयुक्त, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे अधिकारी, अधीक्षक, विधी व न्याय विभागाचे उपसचिव/ अवर सचिव हे चौकशी समितीत होते. काही दिवसांपूर्वीच या समितीने रुग्णालयाला भेट देऊन अहवाल शासनास सादर केला होता.
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख ८० हजार ते ३ लाख ६० हजारांपर्यंत आहे, अशा रुग्णांसाठी १० टक्के बेड्स आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. या रुग्णांना ५० टक्के सवलतीच्या दरात उपचार देणे बंधनकारक आहे. राज्यात ४८६ धर्मादाय रुग्णालये आहेत. मात्र योग्य उपचार मिळत नाहीत.