‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही?, दीड हजार रुपये येण्यास सुरुवात; अकराव्या हप्त्याविषयी आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती..


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

अनेकांच्या खात्यात पैसे जमा झाले असून आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेत की नाही हे तपासण्याचं आवाहन केलं जात आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भातील एक्सवर माहिती दिली आहे.

गेल्यावर्षी जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याचे आश्वासित करण्यात आले. त्यानुसार, ऑगस्ट महिन्यापासून हा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला.

ऑक्टोबर महिन्यापर्यंत सरकारने या योजनेसाठी महिलांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आणि पात्रही झाले. एप्रिल महिन्यापर्यंत महिलांना १० हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत, तर मे महिन्याचा ११ वा हप्ताही महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.

महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे”, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!