पार्थ पवारांची कार्यपद्धती खटकली?; राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांनी थेट शरद पवारांकडे केली तक्रार, पक्षातील अंतर्गत संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात सर्व काही सुरळीत नसल्याचे बोलले जात असतानाच आता पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी थेट शरद पवारांची भेट घेत पार्थ पवारांविरोधात नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातील दोन बड्या नेत्यांनी स्वतंत्रपणे शरद पवारांची भेट घेत पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी केल्या. अजितदादा असताना पक्षात अशी परिस्थिती नव्हती. मात्र आता पार्थ पवार वेगळ्या पद्धतीने पक्ष हाताळत आहेत, अशी नाराजी संबंधित नेत्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. तसेच शरद पवार यांनी कुटुंबप्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी, अशी मागणीही करण्यात आल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीतील काही नेत्यांना पक्षात मान-सन्मान मिळत नसल्याची भावना असून, “आम्हीही पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे,” असे मत त्यांनी शरद पवारांसमोर मांडल्याचे समजते. यामुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

याआधी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरूनही पक्षात विविध चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यशैलीवरून नाराजी व्यक्त होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!