धनंजय मुंडे यांनी अजित पवारांकडे राजीनामा दिला? आता धनंजय मुंडे यांनीच दिलं स्पष्टीकरण…

बीड : संपूर्ण राज्यात सध्या बीड जिल्ह्याची चर्चा आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे सतत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
तसेच धनंजय मुंडे यांनी पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगत होती. मात्र मी राजीनामा दिला नसल्याचा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे.
धनंजय मुंडे हे आज बैठकीसाठी मंत्रालयात पोहोचले होते. यावेळी पत्रकारांकडून राजीनाम्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, “मी कुठलाही राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे तूर्तास तरी बीड प्रकरणात अजित पवार यांनी धनंजय मुंडेंना अभय दिल्याचं दिसत आहे.
बीडमधील हत्या आणि खंडणी प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर काल धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी, सीआयडी करत आहे.
तसेच न्यायालयीन चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये जो कोण दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले. रात्री त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चाही केली आहे.