Devendra Fadnavis : फडणवीसांच्या जवळच्या तीन विद्यमान आमदारांना अजून तिकीट जाहीर नाही!! नेमकं चाललंय काय? आमदार वेटिंगवर…

Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अत्यंत तापले आहे. आगामी २० नोव्हेंबर २०२४ ला २८८ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.
तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत बाजी मारली आहे. भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील तीन मतदारसंघातून विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे.
मात्र, पक्षाचे दोन आणि भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या एका अपक्ष आमदाराला पक्षाने वेटिंगवर ठेवले आहे, त्यामुळे या दोन आमदारांचा पत्ता कट होणार की दुसऱ्या यादीत त्यांना संधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी रविवारी (ता. २०) जाहीर केली आहे. या यादीत सोलापूरमधून विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी या आमदारांना पुन्हा संधी दिली आहे.
पक्षातील या मातब्बर नेत्यांना संधी देताना जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांना मात्र वेटिंगवर ठेवले गेले आहे. पहिल्या यादीत ज्या इच्छुकांची नावे जाहीर झाली नाहीत, त्यांच्यामध्ये अस्वस्थता वाढली आहे. Devendra Fadnavis
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भाजपमध्ये तिकिटासाठी प्रचंड स्पर्धा असून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे आव्हान असणार आहे. लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातही अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान त्यावेळी भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी पहिल्याच यादीत जाहीर करून मोहिते पाटील यांना बंडखोरीच्या तयारीसाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून दिला होता. तो धोका लक्षात घेऊन भाजपकडून पंढरपूरची उमेदवारी सर्वात उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, शरद पवार यांनीही पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी खास रणनीती आखली आहे. भाजपचा कोणता मासा गळाला लागतो, याकडे यावर मतदारसंघाच्या उमेदवारीचे गणित ठरण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचा धडा लक्षात घेऊन बहुधा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच भाजप या मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करू शकतो.