मोहरम मिरवणुकीत मृत्यूचा सापळा? ‘पेनकिलर’च्या नावाखाली विषारी कॅप्सूल वाटप; पोलिसांच्या सतर्कतेने 30,000 जीव वाचले
मुंबई : मोहरमच्या पार्श्वभूमीवर भायखळा परिसरात निघालेल्या मिरवणुकीत हजारो भाविकांना विषारी कॅप्सूल वाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून मुंबई पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी फैयाज प्रेमजी नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्या हालचाली, संपर्क आणि आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांच्या गर्दीत फैयाज हा तरुण कॅप्सूलचे वाटप करत होता. या कॅप्सूल जखमांमुळे होणाऱ्या वेदना कमी करणाऱ्या हर्बल पेनकिलर असल्याचे तो लोकांना सांगत होता. विशेषतः मातम करणाऱ्या आणि स्वतःला जखमा करून घेणाऱ्या भाविकांना या गोळ्या दिल्या जात होत्या. मात्र मिरवणुकीदरम्यान एका व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडल्याने पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तातडीने तपास सुरू केला.
तपासादरम्यान फैयाजकडून जप्त करण्यात आलेल्या कॅप्सूलची पाहणी करण्यात आली. प्राथमिक चौकशीत या कॅप्सूलमध्ये उंदीर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या झिंक फॉस्फेट या विषारी रसायनाचा वापर करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल १४ हजार ९०० कॅप्सूल जप्त केल्या आहेत.

या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने ऑनलाइन माध्यमातून सुमारे ५० किलो झिंक फॉस्फेट पावडर आणि ३० हजार रिकाम्या कॅप्सूलची ऑर्डर दिल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ वैयक्तिक कृती होती की मोठ्या कटाचा भाग, याबाबत तपास यंत्रणा विविध शक्यता पडताळून पाहत आहेत.

घटनेची गंभीरता लक्षात घेत पोलिसांनी तातडीने मिरवणुकीतील गर्दीत जाऊन ध्वनिक्षेपकावरून घोषणा केल्या. वाटप केल्या जाणाऱ्या कॅप्सूल संशयास्पद असल्याची माहिती भाविकांना देण्यात आली. त्यामुळे अनेकांनी त्या घेण्यास नकार दिला आणि संभाव्य जीवितहानी टळली. पोलिसांच्या या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
तपासात फैयाज हा पुण्यातील विमाननगर परिसरातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो सुमारे पंधरा दिवसांपूर्वी मुंबईत आला होता आणि डोंगरी येथील एका हॉटेलमध्ये राहत होता. त्याने मुंबईत येण्यापूर्वी आणि आल्यानंतर कोणकोणाशी संपर्क साधला होता, याची माहिती पोलिस गोळा करत आहेत.
दरम्यान, आरोपीने यापूर्वी इराण आणि इराकला प्रवास केल्याची माहितीही समोर आली आहे. उच्चशिक्षित असलेल्या फैयाजने असे टोकाचे पाऊल का उचलले, त्याला कोणाची मदत किंवा प्रेरणा मिळाली का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. त्याचा मोबाईल फोन, सोशल मीडिया व्यवहार, बँक खात्यांमधील हालचाली आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जात असून हा घातपाताचा प्रयत्न होता की दहशतवादी स्वरूपाचा कट, याबाबतचे सत्य तपासानंतर स्पष्ट होणार आहे.