दौंडच्या पहिल्या महिला आमदार उषादेवी जगदाळे यांचं निधन; राजकीय वर्तुळात शोक..


दौंड : दौंड विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उषादेवी कृष्णराव जगदाळे यांचे गुरुवारी सकाळी पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी सहा वाजता दौंड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि दौंडचे माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे हे त्यांचे पुत्र आहेत. उषादेवी कृष्णराव जगदाळे या १९७२ मध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरून प्रथमच दौंड विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्यानंतर १९८५ मध्ये

त्यांनी पुन्हा विधानसभेत प्रवेश केला. त्यांनी पुणे जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत महिला नेतृत्वाचा ठसा उमटवला.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि बीडच्या माजी खासदार केशरबाई क्षीरसागर यांच्यासोबत त्यांनी विधानसभेत काम केले होते. त्या काळात या तिन्ही महिला आमदार आमदार निवासात रूममेट असल्याची आठवण आजही राजकीय वर्तुळात सांगितली जाते.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले. पुणे-दौंड रेल्वे शटल सेवा सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो. महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण भागातील सुविधांसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सप्टेंबर २०२३ मध्ये त्यांना ‘दौंड भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दौंड तालुक्यात त्या ‘मांसाहेब’ म्हणूनही लोकप्रिय होत्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!