दत्तात्रय गाडेचा अक्षय शिंदे होणार? अटक झाल्यानंतर चर्चांना उधाण, देवेंद्र फडणवीस यांचे मोठं वक्तव्य…

पुणे : दोन दिवसांपूर्वी स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. यानंतर आता त्याची चौकशी केली जात आहे. या आरोपीने तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

त्यामुळे आता अक्षय शिंदे प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ शकते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यावर प्रतिक्रिया देणे खूप घाईचे होईल. या गोष्टीची निश्चित माहिती हाती आली की, त्यावर बोलणे अधिक योग्य होईल. पुणे पोलिसांनी आरोपीला पकडले आहे आणि पुढील कारवाई देखील लगेच सुरू झालेली आहे, असेही फडणवीस म्हणाले.
तसेच ते म्हणाले, पुणे प्रकरणात पोलीस पुढील तपास करतील. काही तांत्रिक आणि फॉरेन्सिक स्तरावरील माहिती आमच्याकडे आलेली आहे. माहिती एकत्र केल्यावर जे समोर येईल, त्यानंतरच यावर बोलणे अधिक योग्य होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पुण्यात झालेल्या अत्याचाराच्या घटनेवरून तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एक वक्तव्य केले यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की ते नवीन आहेत. अशी वक्तव्य करताना माहिती घ्यावी असा सल्ला त्यांनी कदम यांना दिला आहे.

या विधानावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनीपुणे प्रकरणातील आरोपीला अटक केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. आता आरोपीकडून अधिकची माहिती घेतली जात आहे. या घटनेने मात्र राज्यात खळबळ उडाली आहे.