दुभाजकाने घेतले दोन निष्पापांचे बळी; प्रशासन जागे झाले अन् पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील धोकादायक दुभाजकच केले बंद

शिरूर : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरूरजवळ दुभाजकामुळे दोन निष्पापांचा बळी गेल्यानंतर शिरूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्व अनधिकृत आणि धोकादायक दुभाजक बॅरिकेट लावून बंद केले आहेत.
वाडेगव्हाण येथील युवा उद्योजक किशोर यादव यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच दुचाकीवरील प्रथमेश लाड या युवकाचाही मृत्यू झाल्याने पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, यात तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले. पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अनेक हॉटेल्स असून, शिरूर ते कारेगावदरम्यान दररोज मोठ्या संख्येने महिला कामगार दुचाकीवरून प्रवास करतात. त्यामुळे भविष्यात अशा धोकादायक दुभाजकांमुळे पुन्हा अपघात होऊ नयेत, यासाठी पोलिस आणि बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्व धोकादायक दुभाजक बंद केले आहेत.


ही कारवाई करताना शिरूर पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे अंमलदार राजेंद्र वाघमोडे, शेखर झाडबुके यांच्यासह बांधकाम विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
दुभाजक बंद केल्यामुळे वाहनचालकांना वळसा घेण्यासाठी काही अंतर अधिक प्रवास करावा लागणार आहे. मात्र, त्यातून अपघातांचा धोका कमी होऊन महामार्गावरील सुरक्षितता वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.