भल्या सकाळीच अचानक समोर आला दाजी; पुण्यातील मेहुणीसोबत केलं धक्कादायक कृत्य, घटनेने उडाली खळबळ…

पिंपरी-चिंचवड : बहिणीला आणि तिच्या मुलाला राहण्यासाठी आधार देणं एका महिलेला भलतंच महाग पडलं. याच रागातून बहिणीच्या नराधम पतीने आपल्याच मेहुणीवर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही धक्कादायक घटना मोशी येथे घडली आहे. या हल्ल्यात संबंधित महिलेच्या पायाचे हाड फॅक्चर झाले असून, आरोपीने जखमी अवस्थेत असलेल्या महिलेचा मोबाईल आणि सोन्याचे मंगळसूत्रही चोरून नेले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, पीडित ३५ वर्षीय महिलेने आपल्या बहिणीला आणि तिच्या मुलाला कौटुंबिक वादामुळे स्वतःच्या घरी आश्रय दिला होता. मात्र, ही बाब बहिणीच्या पतीला (रा. पिंपळनेर, जि. बुलढाणा) आवडली नाही.

माझ्या पत्नीला आणि मुलाला तुझ्याकडे का ठेवले?, याच रागातून आरोपी शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) सकाळी पावणेआठच्या सुमारास देहू-आळंदी रस्त्यावरील मोशी येथे फिर्यादीच्या घरी पोहोचला.आरोपीने वाद घालत लोखंडी रॉडने मेहुणीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. रॉडचा वार जोरात लागल्याने महिलेच्या पायाला गंभीर दुखापत होऊन हाड फॅक्चर झालं.

महिला वेदनेने विव्हळत असतानाच आरोपीने तिच्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र आणि हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि तिथून पळ काढला.
दरम्यान, या घटनेनंतर जखमी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी ३५ वर्षीय आरोपी पतीविरुद्ध मारहाण आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वादातून एका महिलेला अशा प्रकारे मारहाण केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.