‘दादा, आज तुझं नसणं मनाला चटका लावतंय’; भाऊबीजेच्या दिवशी सुप्रिया सुळेंची अजितदादांसाठी भावूक पोस्ट

पुणे : दिवाळी आणि भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचा सण असतो. मात्र, यंदाची भाऊबीज पवार कुटुंबीयांसाठी भावूक आणि वेदनादायी ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले दिवंगत बंधू अजित पवार यांच्या आठवणीत सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच त्यांनी अजितदादांसोबतचा एक जुना व्हिडिओही पोस्ट केला आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच भाऊबीज असल्याने सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजितदादांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांनी यंदा दिवाळीही साजरी केली नाही. दरवर्षी बारामतीमध्ये पवार कुटुंबीय कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतात. मात्र, यंदा हा कार्यक्रमही झाला नाही. मंगळवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजितदादांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले.
सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये काय म्हटले?

भाऊबीजेच्या निमित्ताने सुप्रिया सुळे यांनी भावाच्या आठवणींना उजाळा देणारी पोस्ट लिहिली आहे. “दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज. दरवर्षी या दिवसाची आम्हा सगळ्या बहिणींना किती ओढ असायची! यंदा मात्र भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि आपल्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

पुढे भावाबहिणीच्या नात्यातील खास क्षण आठवत त्यांनी लिहिले, “आपलं एकत्र येणं, गप्पा, हसणं… आम्हा बहिणींच्या घोळक्यात हरखून गेलेला तू आजही डोळ्यांसमोर उभा राहतोस. तेव्हा अगदी सहज वाटणारे ते क्षण आज किती मोलाचे वाटतात.”
पोस्टच्या शेवटी सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हटले की, “दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं मनाला चटका लावून जातं. आम्हा सगळ्या बहिणींना तुझी किती आठवण येतेय, हे शब्दांत सांगणंही कठीण आहे. तू आमच्या मनात कायम आहेस आणि कायम राहशील.”
